पुणे – मेट्रोच्या कामामुळे बाधित झालेल्या मंडईतील व्यापाऱ्यांचा तब्बल ४ वर्ष प्रलंबित असलेला कांदा बटाटा मार्केट कडील रस्त्याचा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे मेट्रोचे अधिकारी सोनवणे व मेट्रोचे प्रकल्प अधिकारी भट्टाचार्य यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये तातडीने सोडवला असून या व्यापाऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे.
आमदार रवींद्र यांनी सांगितले की,” स्वतःची रोजी- रोटी बाधित होत असताना देखील शहराच्या विकासासाठी मंडईतील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे, परंतु मेट्रोकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये काही त्रुटी राहिल्याने व्यापाऱ्यांना हकनाक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यामध्ये समन्वय साधत मेट्रो प्रकल्प व मंडई यांनी परस्पर सहकार्यातून यात मार्ग काढल्यास व्यापारी बांधवांचा प्रश्न देखील सुटणार आहे. त्यामुळे कांदा बटाटा मार्केटसाठी पुणे मेट्रोने रस्ता खुला करून द्यावा, अशा सूचना केल्या असता मेट्रोने तातडीने पाच जून रोजी सदर रस्ता सुरू करून दिला आहे.
या बैठकीसाठी माजी आमदार मोहन जोशी, ॲड.रूपाली पाटील यांसह पुणे मेट्रोचे अधिकारी व मंडई मधील व्यापारी, विक्रेते व कांदा बटाटा मार्केट मधील व्यवसायिक उपस्थित होते.