पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काॅंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीत धंगेकर खासदार झालेच, तर कसबा विधानसभेच्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये कसबा विधानसभा मतदरसंघाच्या तत्कालिन आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणुकीत तत्कालिन शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत धंगेकर यांचा आमदार होण्याचा मार्ग सुकर केला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून या जागेची मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे या मतदारसंघात कोणाचे राजकीय वर्चस्व अधिक आहे? यावर विधानसभेची गणिते ठरणार आहेत. त्यासाठी या मतदारसंघातील पक्षीय बलाबल आणि मागील दोन विधासभांचा तुलनात्मक अभ्यास करता, आधी काॅग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा दावा येतो. त्यानंतर शिवसेना असे प्राथमिक स्वरूपात सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणूक : २०१४
च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील चारही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यामुळे कसब्यात भाजप, शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार उभे केले. त्यावेळी गिरीश बापट यांना ७३,५९४, काॅंग्रेसचे रोहित टिळक यांना- ३१,३२२ रवींद्र धंगेकर (मनसे) यांना २५ हजार ९९८ मते होती. तर राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांना १५ हजार ८६५ मते मिळाली. शिवसेनेचे प्रशांत बधे यांना ९ हजार मते मिळाली. ते सहाव्या क्रमांकावर होते. तर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात मनसे आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक होते. तसेच शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता.
विधानसभा निवडणूक : २०१९
या मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेले. तर, मनसेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तसेच धंगेकर यांनीही काॅंग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात सर्वाधिक फायदा झाला.
२०१९ मध्ये पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र झाले. तर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यामुळे भाजपच्या मुक्ता टिळक या ७५ हजार मते मिळवित विजयी झाल्या. तर, काॅंग्रेसचे अरविंद शिंदे यांना ४७ हजार मते मिळाली. शिवसेनेकडून बंडखोरी करत विशाल धनावडे हे अपक्ष लढले त्यांना १३ हजार ९८९ मते मिळाली.
विधानसभा पोटनिवडणूक : २०२३
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्याच्या काही महिने आधीच शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले.
याचे पडसाद कसब्यात दिसून आले आणि काॅंग्रेसच्या तिकिटावर मैदानात असलेले रवींद्र धंगेकर ८३ हजार मते मिळवित विजयी झाले. तर भाजपच्या हेमंत रासने यांना ६२ हजार मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंघ होती. तर, आता राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडले आहेत. त्यांचीही या मतदारसंघात निर्णायक ताकद आहे.