पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि तारखा, आचारसंहिताही जाहीर झाली. मात्र, शहर कॉंग्रेसचे अंतर्गत गटबाजीमुळे अद्याप उमेदवारीचे सूपही वाजले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अंतर्गत नाराजी थेट मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीतच दिसून आली. काही कार्यकर्त्यांनी ती थेट शहर पदाधिकाऱ्यांना बोलूनही दाखवली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा करण्यात आली.
या बैठकीला आमदार रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, रमेश बागवे आदी माजी आमदार, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, आबा बागुल, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, चंदू कदम, गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट, सुनील शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसचा उमेदवार केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असताना पुणे शहर कॉंग्रेसमधील गटबाजी आणि नाराजीचा सूर संपण्याला तयारच नाही. पक्षातील इच्छुक आपल्याच कार्यकर्त्यांना डावलून स्वत:च सगळेकडे फिरत असून, आपणच पक्ष चालवत आहोत, अशा थाटात फिरत आहेत.
ही स्थिती राहणार असेल तर आपण जिंकणार कसे? अशी थेट नाराजीच कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केली. त्यानंतर पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही, मात्र आपल्यातील फूट उंबऱ्याबाहेर जाऊ देऊ नका, अशी विनंती करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.