मुंबई – गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावत गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठोकला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील शिंदे गटात सामील होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तसेच यासाठी त्यांनी शिंदे यांच्यासह अन्य आमदारांना 100 वेळा फोन केल्याचा दावा भाजपानेते रोहित कंभोज यांनी केला आहे. मात्र जाधवांना शिंदे यांच्यासह अन्य आमदारांचा विरोध असल्याचेही कंबोज यांनी म्हटले आहे.
राज्यात जून 2022मध्ये विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर अतिशय वेगाने नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार गुजरातच्या सुरतमधील एका हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला. त्यानंतर ते आसाममधील गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये गेले. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील 39 आमदारांचे समर्थन मिळाले होते. याचदरम्यान जाधव यांना देखील शिंदे गटात सामिल व्हायचे होते मात्र, ते विश्वास ठेवण्याजोगे नाहीत असे सर्वांचे मत असल्याने त्यांच्या फोनला प्रतिसाद देण्यात आला नसल्याचेही कंबोज यांनी म्हटले आहे.
ठाकरेंच्या तक्रारींचा पाढा –
आपण स्वत: तिकीट काढून गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये येतो आणि जोपर्यंत तुम्ही मला आपल्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी परतणार नाही, अशी भूमिका जाधव यांनी घेतली होती. त्यांच्यासमवेत आमदार सुनील राऊत देखील होते. तसेच जाधव यांनी फोनवरून उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढाही त्यावेळी वाचला होता, असेही कंबोज यांनी पुढे म्हटले आहे.