रांची – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे लालूंचा तुरूंगातील मुक्काम आणखी लांबला आहे.
चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांत लालूंना दोषी ठरवण्यात आले. त्यातील तीन प्रकरणांत त्यांनी आधीच जामीन मंजूर झाला आहे. आता चौथ्या प्रकरणात जामीन मंजूर झाला तर लालू तुरूंगाबाहेर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे शुक्रवारच्या सुनावणीला महत्व प्राप्त झाले.
लालू 42 महिन्यांपासून अधिक काळ तुरूंगात असल्याची माहिती सुनावणीवेळी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दिली. तर, लालू 34 महिनेच तुरूंगात असल्याचे सीबीआयने म्हटले. त्यावर न्यायालयाने सिब्बल आणि सीबीआयला तुरूंगवासाच्या कालावधीची खातरजमा करण्यास सांगितले. तसेच, सुनावणी पुढे ढकलली.