शिक्रापूर (पुणे) -शिक्रापूर पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी गॅस टॅंकरमधून गॅसचोरी करताना रंगेहाथ आरोपीला पकडले. याबाबत महसूल विभागाला कळविले असताना देखील महसूल विभाग चार दिवसांपासून याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारत गॅस फाटा परिसरात एका हॉटेलच्या पाठीमागे काहीजण टॅंकरमधून गॅस चोरून सिलेंडरमध्ये भरत असल्याची माहिती 24 नोव्हेंबर रोजी शिक्रापूर पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश थोरात, पोलीस शिपाई संतोष शिंदे, किशोर शिवणकर, राजेंद्र घनवट यांनी त्या ठिकाणी जाऊन पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे दोघे गॅस टॅंकरमधून रेग्युलेटर लावून टाकीमध्ये गॅस भरत असल्याचे दिसून आले; मात्र यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागताच तेथील एकजण पळून गेला. यावेळी पोलिसांनी तेथून गॅस टॅंकर तसेच एक पिकअप वाहन जप्त केले.
पिकअपमध्ये गॅसने भरलेले 26 सिलेंडर टाक्या आणि चार मोकळ्या सिलेंडर टाक्या मिळून आल्या. पोलिसांनी सर्व वाहन व गॅस सिलेंडर शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणून लावले. याबाबत महसूल विभाग व पुरवठा विभाग यांना पत्रव्यवहार केले. वारंवार माहिती दिली. तरीदेखील महसूल विभागाचे अधिकारी चार दिवस उलटून देखील इकडे फिरकले नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे महसूल विभागाचे चालले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- शिक्रापूर पोलिसांनी चोरी करताना पकडलेल्या गॅस टॅंकरबाबत शिरूर तहसील विभागास कळवले आहे. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांचेकडे हा तपास सोपवला आहे.
-श्रीशैल व्हट्टे, नायब तहसीलदार शिरूर - मी रजेवर असून आमचे सहाय्यक पुरवठा अधिकारी गायकवाड यांना उद्या पाठवून देतो. शिक्रापूर पोलीस तहसीलदार कार्यालयात आले होते. तहसीलदार लैला शेख यांनी पोलिसांनी वाहन पकडले असल्याने पोलिसांनीच गुन्हा दाखल करावा असे सांगितले आहे.
-ज्ञानदेव यादव, पुरवठा विभाग प्रमुख शिरूर