तृणमूलला दुहेरी हादरा : मंत्री सुवेंदू अधिकारी यांचा राजीनामा; एका आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

कोलकता – पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला शुक्रवारी दुहेरी हादरा बसला. त्या पक्षाचे प्रभावी नेते असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर, आमदार मिहीर गोस्वामी यांनी तृणमूलला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

काही दिवसांपासून अधिकारी यांचे तृणमूल नेतृत्वाबरोबरचे संबंध बिघडल्याचे संकेत मिळत होते. अशात त्यांनी बुधवारी एका आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ त्यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. तृणमूलच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम आंदोलनाने बंगालच्या सत्तेपर्यंत पोहचवले. त्या आंदोलनाचा अधिकारी हे महत्वाचा चेहरा होते.

तृणमूलला सत्ता मिळाल्यानंतर अधिकारी यांचे राजकीय वजन आणखी वाढले. बंगालमधील 30 ते 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. राजकीय पटलावरील अधिकारी यांचे महत्व विचारात घेऊन भाजपने त्यांना थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. अधिकारी यांनी तूर्त तृणमूल सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. आता त्यांच्या पुढील राजकीय पाऊलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अधिकारी यांच्यापाठोपाठ आमदार गोस्वामी यांच्या कृतीमुळे तृणमूलला दुसरा हादरा बसला. बंगालमधील भाजपच्या एका खासदारासमवेत गोस्वामी दिल्लीला पोहचले. भाजपच्या मुख्यालयात दाखल होऊन त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज होत आहेत.

अशात सत्तारूढ तृणमूलला हादरवणाऱ्या दोन घडामोडी एकाच दिवशी घडल्या. अनेक नेते तृणमूल सोडतील, असा दावा सातत्याने भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे गळती रोखण्याचे मोठे आव्हान तृणमूलपुढे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.