कोपरगाव – घरावर बाभळीचे भले मोठे झाड कोसळून घरात बसलेल्या तरुणाचा झाडाखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय संजय मोरे (वय 29) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो शेतमजुरी आणि मालवाहू रिक्षा चालवण्याचे काम करीत होता.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बाभळीचे झाड घरावर कोसळल्याने झाडाखाली दबून एका 29 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दत्तात्रय संजय मोरे असे या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मदत करून तरुणाला बाहेर काढलं आणि ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे तसेच पोलीस अधिकारी आणि कोल्हे कारखान्याची यंत्रणा मदतीला पोहोचली होती. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दत्तात्रय याच्यामागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून दत्तू हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.