पुणे – अक्षयतृतीयेनिमित्त आज पुण्यातील सारस बाग येथील ‘श्री महालक्ष्मी’ देवीला मोगऱ्यासह विविध सुवासिक फुलांचा पुष्पाभिषेक, पुष्पमुकुट व पुष्पपोशाख परिधान करण्यात आला. यावेळी देवीचे दिसणारे विलोभनीय रुप आणि मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता भक्तांनी गर्दी केली. सारस बागेसमोरील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोगऱ्याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल 151 किलो मोगरा, 251 गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. भाविकांनी अक्षयतृतीयेनिमित्त देवीदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अक्षय्यतृतीयेचा भावार्थ… अक्षय्यतृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. अक्षय्यतृतीया या उत्सवाचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत. त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान याचा मनोज्ञ संगम घडून आला आहे. या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती साजरी केली जाते. तसेच इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसते की, या दिवशी परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंतीही विशेषत्वाने साजरी केली जात असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो.