गांधीनगर – गुजरात सरकारने एक परिपत्रक जारी केले असून त्याद्वारे असे स्पष्ट केले आहे, की बौध्द धर्म हा एक वेगळा धर्म मानला गेला पाहिजे. तसेच हिंदू धर्म सोडून बौध्द, जैन अथवा शीख धर्म स्विकारण्यापूर्वी गुजरात फ्रिडम ऑफ रिलिजन ॲक्ट २००३ नुसार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाणे आवश्यक आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या बातमीनुसार गुजरातच्या गृहमंत्रालयाने ८ एप्रिल रोजी हे परिपत्रक जारी केले आहे. (Gujarat govt notice requires Hindus to seek permission for converting to Buddhism)
बौध्द धर्माचा स्विकार करण्याच्या संदर्भात जे अर्ज प्राप्त झाले आहेत किंवा आले आहेत त्यांच्याबाबत नियमांनुसार कार्यवाही होत नसल्याचे सरकारला आढळून आले होते. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असल्याचे संबंधित बातमीत म्हटले आहे.
गुजरातमध्ये दसरा अथवा अन्य कोणत्या सणाच्या दिवशी दलित समुदायातील नागरिक मोठ्या प्रमाणात बौध्द धर्म स्विकारत असल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. गुजरात सरकारने दोन दशकांपूर्वीच गुजरात फ्रिडम ऑफ रिलिजन ॲक्ट अर्थात धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा आणला आहे. आमिष दाखवून अथवा बळजबरीने किंवा चुकीची माहिती देऊन अथवा गैरमार्गाने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला आळा घालणे हा त्यामागील उद्देश होता.
विवाहाच्या माध्यमातून केले जाणारे बळजबरीचे धर्मांतर रोखण्यासाठी या कायद्यात २०२१ मध्ये दुरूस्ती करण्यात आली होती. या कायद्यानुसार १० वर्ष कैद आणि पाच लाख रूपये दंडाची तरतूद आहे तसेच आरोपीने स्वत: पुरावे देणे बंधनकारक आहे. पोलीस उप अधिक्षकाच्या खालच्या दर्जाचा अधिकारी या प्रकरणांचा तपास करू शकणार नाही अशीही तरतूद करण्यात आली आहे. सरकारने केलेल्या या दुरूस्तीला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून तेथे हा खटला प्रलंबित आहे.