लंडन – करोनाचा धोका अनेक देशांत वाढल्याने त्यांच्या मदतीसाठी देखील अनेकजण पुढे येत आहेत. त्यात आता विश्वविजेत्या इंग्लंड संघातील अव्वल खेळाडू जोस बटलर याने आपल्या विश्वकरंडक स्पर्धेत वापरलेल्या जर्सीचा लिलाव करून त्यातून मिळालेली 80 हजार डॉलरची रक्कम करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी दिले आहेत.
विश्वकरंडक स्पर्धेत जी जर्सी वापरण्यात आली होती, त्याचा गेले सहा दिवस लिलाव सुरू होता. त्यातच एका क्रिकेट चाहत्याने तब्बल 80 हजार डॉलरची बोली लावून ही जर्सी विकत घेतली. हा संपूर्ण निधी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तसेच उपचारांसाठी देण्यात आला आहे. चीनकडून जगभरातील अनेक देशांत करोनाने हाहाकार माजवला आहे त्यात इंग्लंडमध्ये दर दिवशी करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. खरेतर ही जर्सी माझ्यासाठी खूप खास होती. हीच जर्सी घालून मी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळलो होतो. त्यामुळे या जर्सीमध्ये माझ्या भावना गुंतल्या होत्या. मात्र, सध्या देशात करोनशाचा वाढता धोका पाहता रुग्णांच्या मदतीसाठी माझ्या भावना बाजूला ठेवून ही जर्सी लिलावात विकण्याचा निर्णय घेतला व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, असे बटलरने यावेळी व्यक्त केले.
गेल्या वर्षी 14 जुलैला इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. त्यात इंग्लंडने विजय मिळवत प्रथमच विश्वकरंडक जिंकण्याची कामगिरी केली होती.