कोपरगाव (प्रतिनिधी) : -शहरातील लक्ष्मी नगर भागातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहीती मिळताच तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्या कुटुंबातील ७ व्यक्ती व इतर ११ जनांच्या घशाचे श्राव तपासणीसाठी पाठवले होते. मात्र आता यातील १३ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले असल्याने शहरवासीयांच्या चिंतेत काही प्रमाणात घट झाली आहे.
याबाबत आरोग्य विभागातर्फे, बाधीत महीलेच्या संपर्कातील कुटुंबीय, व अन्य अशा 13 जणांची करोना विषाणू चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली. सदर बाधित महिलेची प्रकृती स्थिर असून तिला सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान एका व्यक्तीला आत्मा मालिक रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागातर्फे कोरोना लक्षणं आढळलेल्या या महिलेस कोरोना चाचणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले होते. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी चाचणी पॉसिटीव्ह आल्याने शहरातील लक्ष्मीनगर भागात वास्तव्यास असलेल्या या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोग्य विभागातर्फे तातडीने सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण 18 जणांना कोरोना चाचणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तेरा जणांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून ते सर्वजण कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. यातील पाच जणांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहेत. शहरात कोरोणाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून आरोग्य यंत्रणेच्या वतीने तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली तर आत्मा मालिक हॉस्पिटलच्या मागे असलेले रहिवासी होस्टेल ताब्यात घेण्याची शासनाने तयारी सुरू केली आहे. तसेच गौतम पब्लिक स्कूल येथील होस्टेल देखील शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.