विषाणू संसर्गाचा उल्लेख नसल्याने आयपीएलला फटका
मुंबई – दूरदृष्टीचा अभाव केवळ अडाणी लोकांमध्येच दिसतो असे नाही तर सुशिक्षीत व्यक्तीही यात अपयशी ठरतात हे वारंवार स्पष्ट झाले आहे. तसाच काहीसा प्रकार विम्बल्डन टेनिस स्पर्धा व आययपीएल यांत दिसत आहे. स्पर्धेचा विमा काढताना विम्बल्डन समितीने त्यात विषाणू संसर्गाचा उल्लेख केला असल्याने त्यांना 1 हजार कोटींपेक्षाही जास्त रक्कम भरपाई म्हणुन मिळणार आहे. तर विमा काढताना नेमका हाच उल्लेख नसल्याने आयपीएल रद्द झाल्यास एक छदामही बीसीसीआयला मिळणार नाही.
29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे गेली असली तरीही त्यावेळी देखिल ही स्पर्धा होणे अशक्य दिसत आहे. दुसरीकडे मानाची विम्बल्डन टेनिस स्पर्धादेखील रद्द झाली असली तरीही स्पर्धेचे आयजोक आनंदात आहेत.
जगातील प्रत्येक मोठ्या स्पर्धेचा विमा काढला जातो. नैसर्गिक प्रकोप, मानव निर्मित संकट, युद्ध, देशांतर्गत यादवी, दंगल आदी गोष्टींचा उल्लेख यात केला जातो जेणेकरुन अशी स्थिती निर्माण झाली आणि स्पर्धा रद्द झाली तर त्याची नुकसान भरपाई मिळते. जी शक्कल विम्बल्डन समितीने विमा काढताना लढवली तिथेच आयपीएलबाबत बीसीसीआयने गल्लत केली व आता जर ही स्पर्धा रद्द झाली तर जवळपास 4 हजार कोटींचा फटका बसणार आहे.
हजारो कोटींचे नुकसान…
आयपीएल रद्द झाली तर स्पर्धेशी निगडीत असलेल्या सगळ्यांनाच नुकसान सोसावे लागणार आहे. यात सर्वात जास्त फटका बीसीसीआय व सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या स्टार स्पोर्टस या वाहिनीला बसणार आहे. स्टारचे अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान होईल. तसेच स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेल्या विवो कंपनीकडून मिळणारे जवळपास 500 कोटींवरही पाणी सोडावे लागणार आहे.