श्रीलंकेत 80 भारतीय अडकले

नवी दिल्ली : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक लॉकडाऊनमुळे जगभरातील हजारो लोक परदेशात अडकले आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलोंबोमध्ये किमान 80 भारतीय अडकले आहेत. प्रवासबंदीमुळे हे सर्वजण अडकून पडले आहेत आणि आता त्यांच्याजवळील पैसेही संपत आल्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढत चालली आहे. त्यापैकी बरेच जण हॉटेल, गेस्टहाउस आणि मित्रांच्या घरांमध्ये मुक्कामी आहेत, हे सर्वजण आपापल्या घरी परतण्यास आतुर झाले आहेत.

20 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत यापैकी बहुतेकांना खाण्यासारखे काही उपलब्ध नव्हते. त्यानंतर भारतीय दूतावासाने त्यांना मदत केली आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. मात्र एकाकीपणा, आर्थिक विवंचना आणि नैराश्‍याने यांना ग्रासले आहे. मूळचे कोलकात्याचे असलेले खलाशी अभिनव चक्रवर्ती यांनी प्रातिनिधीक प्रतिक्रिया व्यक्‍त केली. परराष्ट्र मंत्रालयाने अडकलेल्या भारतीयांना सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचना परदेशातील आपल्या दूतावासांना दिल्या आहेत. यापूर्वीच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये अडकलेल्या भारतीयांना अडकलेल्या देशातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

दुबईच्या विमानतळावर 19 भारतीय अडकले
दुबई विमानतळावर 19 भारतीय तीन आठवड्यांपासून अडकले आहेत. करोनाच्या साथीमुळे भारताने आंतरदेशीय विमान उड्डाणे थांबविली तेव्हा यापैकी बहुतेक जण प्रवासाच्या तयारीत होते. पहिले काही दिवस या प्रवाशांपैकी पुरुष मंडळी विमानतळावरील बाकांवरच राहिले. 21 मार्च रोजी त्यांची कोविड -19 ची चाचणी झाली आणि ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना 25 मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या हॉटेलमध्ये हलविण्यात आले आणि तेंव्हापासून ते तेथेच आहेत. यामध्ये अरुण सिंह नावाचा तरुणही आहे. विमानतळावर आल्यावर त्याला डुलकी लागली आणि विमानातील प्रवाशांसाठी केलेली उद्‌घोषणा त्याला समजलीच नाही. विमान निघून गेले आणि तो विमानतळावरच राहिला. मात्र त्याचमुळे तो दुबईत अडकला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.