Bill Gates On artificial intelligence – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सध्या जागतिक पातळीवर बरीच चर्चा चालू आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकास करीत आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपले काम पळवू शकते असे स्वतः बिल गेट्स यांनी सुचित केले आहे.
ते म्हणतात की, एक दिवस असा येईल की कृत्रिम बुद्धिमत्ता मला असे सांगेल की, मी जगातून मलेरिया निर्मूलन करू शकते. सध्या बिल गेट्स जगातील अनेक साथीचे रोग संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी लसीकरण आणि इतर उपाययोजनांना बिल गेट्स आर्थिक आणि तांत्रिक मदत करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी हे वक्तव्य केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर ओपन एआय या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांच्याबरोबर बिल गेट्स यांनी चर्चा केली. यावेळी बिल गेट्स यांनी हे वक्तव्य केले. चॅट जीपीटीच्या कामकाजाबाबत आनंद व्यक्त करून बिल गेट्स म्हणाले की, माझ्या अपेक्षेपेक्षा चॅट जीपीटी उत्तम काम करीत आहे.
यावेळी बोलताना सॅम अल्टमन यांनी म्हणाले की, ज्या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन होत आहे. त्यावरून आगामी काळामध्ये जागतिक तांत्रिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिल गेट्स म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे गुंतागुंतीचे सामाजिक, आरोग्य आणि शिक्षण विषयक प्रश्न कमी वेळामध्ये सुटण्याची शक्यता खुली झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परंपरागत नोकर्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे गेट्स यांना वाटते. सध्या गेट्स मलेरिया निर्मूलन आणि इतर साथीच्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कृत्रीम बुद्धिमत्ता एके दिवशी असे म्हणेल की हे काम मी सहज करू शकते असे बिल गेट्स विनोदाने म्हणाले.
सध्या जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरायची की नाही, त्यावर कोणी कसे नियंत्रण ठेवायचे या संदर्भात उलट सुलट चर्चा चालू आहे. असे असताना शास्त्रज्ञ मात्र आपल्या प्रयोगशाळात या विषयावर संशोधन करीत आहेत.