महत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी

टी-20 विश्‍वकरंडकालाही फटका बसणार

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धांच्या पात्रता फेरीच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. करोनाच्या धोक्‍याने जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फटका अनेक सहयोगी सदस्य देशांच्या संघांना बसण्याची शक्‍यता आहे, इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियात ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धालाही बसण्याची शक्‍यता नाकारता
येत नाही.

करोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळे सर्व देशांनी आपल्या क्रिकेट मालिका यापूर्वीच रद्द केल्या आहेत. आता आयसीसीच्या निर्णयाचे पडसाद कसे पडतात याकडे लक्ष लागले आहे. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा ऑक्‍टोबरमध्ये जरी होत असली व त्यासाठी आणखी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी असताना सहयोगी देशांना त्यात पात्रता कशी मिळणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कॅनडा, नेपाळ, जपान, केनिया, आयर्लंड, झिम्बाब्वे या देशांनी यापूर्वी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पात्रता मिळविलेली होती, यंदा टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत पात्र होण्यासाठी या संघांनी कसून सरावही सुरू केला होता.

करोनाचा धोका निर्माणच झाला नसता तर आयसीसीच्या पात्रता स्पर्धेत दमदार कामगिरी करुन पात्र ठरण्याची त्यांना संधी होती, ती आता धूसर झाली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय दर्जा मिळालेले सर्व प्रमुख देश थेट पात्र होतात. मात्र, अन्य सहयोगी देशांना पात्रता स्पर्धेतूनच मुख्य स्पर्धेला पात्र होण्याची संधी असते तीच आता त्यांना कधी मिळणार हे सर्वस्वी आयसीसीवर अवलंबून आहे.

पात्रता फेरीच्या सर्व स्पर्धा रद्द केल्यामुळे येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर तरी आयसीसी या स्पर्धा घेणार का हा प्रश्‍न आता या देशांसमोर पडलेला आहे.
करोना विषाणूंच्या प्रभावामुळे आतापर्यंत जगभरात जवळपास 21 हजार लोकांचा मृत्यू झाला असून 4 लाखांपेक्षाही जास्त लोक करोना पॉझिटिव्ह आहेत. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने त्यांच्या आगामी कार्यक्रमात हा बदल केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.