अहमदाबाद – कॉंग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेताच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेस समोरील आव्हाने पाहता खर्गे यांनी निवडणूक रणनीती तयार केली आहे. या रणनीतीनुसार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरवण्यात आले आहे.
कॉंग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्या यादीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना वरिष्ठ निरीक्षक बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सत्तेत किंवा संघटनेत नसलेले माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवले आहे. पुढील महिन्यात गुजरात-हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
राजस्थान कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादाला पूर्णविराम देण्यासाठी आणि आपसातले मनमुटाव दूर करण्यासाठी हायकमांडने हा खास फॉर्म्युला स्वीकारला आहे. कॉंग्रेसने गुजरात-हिमाचल निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती, ज्यात 40 नेते तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारली आहे.
राजस्थान कॉंग्रेसचे गेहलोत आणि पायलट यांच्यासह इतर नेत्यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. कॉंग्रेस हायकमांडने गुजरात निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षाने रघू शर्मा यांना गुजरातचे प्रभारी बनवले असून त्यासोबतच गेहलोत यांच्याकडे हिमाचल निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांची हिमाचल निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत सचिन पायलट यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.