पुणे – हॉटेल व्यवस्थापक तरुणावर शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री धायरी भागात घडली. या खुनामागचे कारण समजू शकले नाही. भरत भगवान कदम (वय 24, रा. धायरेश्वर प्राईड सोसायटी, मतेनगर, धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांचा भाऊ प्रकाश यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम धायरीतील एका बिर्याणी हाऊसचे व्यवस्थापक होते. मध्यरात्री हॉटेल बंद केल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी निघाले होते. धायरेश्वर मंदिर ते पारी कंपनी चौक रस्त्यावर निर्मिती असोसिएटस इमारतीसमोर हल्लेखोरांनी भरतला अडवले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भरत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. गंभीर जखमी अवस्थेतील भरतला रुग्णालयात नेण्यात आले.
उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची दुचाकी घटनास्थळी सापडली. पैसे, पाकीट तसेच अन्य कागदपत्रे खिशात सापडली. चोरीच्या उद्देशाने भरतचा खून झाला नसावा, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.