Gopichand Padalkar – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आणि त्यांनी अजित पवार यांचा थेट ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ असा उल्लेख केला होता. त्यांचे हे वक्तव्य आता त्यांना भोवणार असल्याचे चित्र आहे. या त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात बारामतीतील नितीन यादव यांनी वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणावर बोलताना वकील सरोदे म्हणाले की, “गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर विधान केले की, अजित पवार हे लांडग्याचं पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळेही लांडग्याचं पिल्लू आहे. पण दुसऱ्याची अब्रू नुकसान करणे, अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांच्यातर्फे गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी असं नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. पडळकरांनी सात दिवसात माफी मागितली नाही किंवा नोटीसला उत्तर दिले नाही, तर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.”
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर –
काही दिवसांपू्र्वी मराठा आरक्षणाच्या उपोषणादरम्यान धनगर समाजाला STमधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने मागणी केली होती. त्यासंदर्भात काहीजणांनी उपोषणही सुरु केले होते. त्यादरम्यान बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिले नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे.” तसेच सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करून ‘लबाड लांडग्याची लबाड लेक’ असे म्हंटले होते.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी अनेकवेळा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार, अजित पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. मात्र आता अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही पडळकर यांच्याकडून टीका करण्यात आली. पडळकर यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला होता. राज्यभराता ठिकठिकाणी पडळकर यांच्या विधानाचा निषेध करत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.