बार्सिलोना – करोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांच्या मदतीसाठी जगभरातून दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा बलाढ्य फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा प्रसिद्ध खेळाडू लियोनेल मेस्सी तसेच मॅंचेस्टर सिटीचे व्यवस्थापक पेप गार्डिओला यांनी तब्बल 8 कोटी रुपयांची मदत घोषित केली आहे.
मूळ अर्जेंटिनाचा खेळाडू असलेला मेस्सी युरोपातील स्पर्धांमध्ये बार्सिलोनाकडून खेळतो. या दोघांनी दिलेली मदत करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तसेच अन्य आरोग्य सेवांसाठी वापरण्यात येणार आहे.
गॉर्डिओला यांनीदेखील इतकीच रक्कम मदत म्हणून दिली आहे. करोनावाधित व्यक्ती ज्या रुग्णालयात दाखल आहेत, तेथे योग्य सेवा पुरविल्या जाव्यात हाच या मदतीचा उद्देश आहे. इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये 2 हजार 700 लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मेस्सीने सोशल मीडियावर पोसेट केली आहे.
जनसामान्यांना प्रत्यक्ष मदत करण्याची संधी वारंवार मिळत नाही, यावेळी आम्हाला ही संधी मिळाली याचे खूप समाधान वाटते, असेही मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
करोनाचा मुकाबला करताना लोकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. उलट सातत्याने मिळणाऱ्या सूचना पाळाव्यात. तुम्ही जर घरातच थांबलात तरच या धोक्यापासून दूर राहू शकता. मी तर असे म्हणेन की आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ देण्याची हीच चांगली संधी आहे, असे मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.
या काळात आपल्या संयमाची परीक्षा आहे. केवळ एखाद्याच देशात नव्हे तर जगभरासाठी हा काळ कठीण आहे. करोनाग्रस्तांसाठी ज्या व्यक्ती कार्यरत आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो, असेही त्याने व्यक्त केले आहे.