नाशिक – धोंड्याचा महिना म्हटला की जावईबापूंना मोठा मान सन्मान असतो. घरोघरी जावईबापूंना बोलावणं पाठवले जाते. त्यानंतर मुलीचा मान आणि जावयाला वाण दिले जाते. याच पार्श्वभूमीवर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने लेकीची आणि जावयाची काढलेली जंगी मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल सहा बैलगाड्यांच्या माध्यमातून टाळ मृंदुंगाचा गजरात हा अनोखा सोहळा पार पडला.
अधिक मास हा दर तीन वर्षांनी येत असतो. अधिक मास असल्याने त्यास धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते. महाराष्ट्रात याला वेगळी परंपरा असून सासरची मंडळी जावयाला घरी बोलवून त्याचा मानपान करतात. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात धोंड्याचा महिना साजरा केला जात असून याच पार्श्वभूमीवर शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेल्या गौतम हिरण यांनी लेकीची आणि जावयाची जंगी मिरवणूक काढत अनोखा सोहळा साजरा केला आहे. त्यामुळे परिसरात जावईबापूंच्या मिरवणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे.
या सोहळ्यात लेझिम पथक, हलगी, टाळ-मृंदुगाचा गजरही यावेळी झाला. रवी शंकर मार्गावरील शुभ भाग्य या बंगल्याजवळ सकाळी 10 वाजेपासून हा कार्यक्रम सुरु होऊन परिसरातून वाजत गाजत मिरवणुकीला साज चढला. दरम्यान या अनोख्या सोहळ्यासाठी मुलगी आणि जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही होता. जावयाने धोतर, कुर्ता आणि टोपी परिधान केले होते.
मुलगीने नववारीचा शृंगार केला होता. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी आणि फुलांची सजवाट करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, 13 बहिणी आणि सर्व जावई आले होते. गौतम कांतीलाला हिरण यांनी सांगितले की, आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी, यासाठी थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला.