ED Action on Louise Khurshid – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांच्या ट्रस्टची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. राजधानीतील ईडीच्या झोनल ऑफिसने लुईस खुर्शीद यांच्या डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टची सुमारे 46 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्र सरकारकडून दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटपासाठी देण्यात येणारे अनुदान बळकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरुखाबादमधील लुईस खुर्शीद यांच्या 29.51 लाख रुपयांच्या 15 शेतजमिनी आणि डॉ. झाकीर हुसेन यांच्याशी संबंधित चार बँक खात्यांमध्ये जमा केलेले 16.41 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ट्रस्टला मिळालेले 71.5 लाख रुपयांचे अनुदान भारत सरकारने मंजूर केलेल्या दिव्यांगांसाठी शिबिरे आयोजित करण्यासाठी न वापरता, ट्रस्टच्या प्रकल्प संचालक लुईस खुर्शीद, प्रतिनिधी प्रत्युष शुक्ला, सचिव मोहम्मद अथर यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
ही रक्कम जंगम मालमत्तेत गुंतवली होती. डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टचे प्रतिनिधी प्रत्युष शुक्ला आणि इतरांविरुद्ध यूपी पोलिसांच्या ईओडब्ल्यूने नोंदवलेल्या 17 एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. या सर्व प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
ईडीने अनेकवेळा चौकशी केली –
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांची अपंगांना उपकरणे वाटपात घोटाळा केल्याप्रकरणी ईडीच्या पथकाने अनेकवेळा चौकशी केली आहे.