वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा निकाल शनिवारी रात्री लागला आणि फेरनिवडीच्या प्रयत्नात असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी निराशा आली.
अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा निवड होण्याच्या प्रयत्नात पराभव स्वीकारावा लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील 11 वे विद्यमान अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी दहा अध्यक्षांना फेरनिवडीच्यावेळी पराभव स्वीकारावा लागला आहे.
रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या गेराल्ड फोर्ड यांनाही 1976 साली फेरनिवडीसाठीच्या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला होता. सर्वात शेवटी फेरनिवड होण्याच्या प्रयत्नात 1992 साली पराभूत झालेले अध्यक्ष जॉर्ज एच. डब्लू बुश हे होते.
त्यापूर्वी 1888 साली ग्रोव्हर क्लेवेलॅन्ड यांचाही फेरनिवडीच्या निवडणूकीत पराभव झाला होता. मात्र चार वर्षांनंतर झालेल्या निवडणूकीत त्यांनी तात्कालिन अध्यक्ष बेंजामीन हॅरिसन यांचा पराभव करून अध्यक्षपद मिळवले. दोन वेगवेगळ्या कालखंडामध्ये अध्यक्ष झालेले ते अमेरिकेचे एकमेव अध्यक्ष ठरले.
या यादीमध्ये पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अध्यक्षपदाची निवडणूकच न लढवू शकलेल्या अध्यक्षांचा समावेश नाही.