अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला साडेपाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त
सिंधुदुर्ग – अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून दिवाळीपुर्वी नुकसान भरपाईचे वाटप सुरु होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत आज यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाच्या उद्घाटन आज पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी पालकमंत्री ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालनकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जि.प. सदस्य नगेन्द्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झाराप येथे वैद्यकिय महाविद्यालयासाठी शिक्षण विभागाची जागा देण्यास 48 तासात मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे यासाठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरु करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुकास्तरावरही घेण्यात येणार आहेत.
तळगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या तलाठी सजाचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे. दर सोमवारी आणि गुरुवारी तलाठी या कार्यालयात थांबून लोकांची कामे करतील. तलाठी यांनी लोकांचा विश्वास संपादन करुन चांगले काम करावे, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.
खासदार आणि आमदार यांचे कौतुक
आदर्श खासदार कसे असावेत हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यावे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते यांचा वारसा लाभला आहे. याचे जतन खासदार विनायक राऊत करत आहेत. आमदार वैभव नाईक यांचे काम ही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत, या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणण्याचे काम ही आमदार नाईक यांनी केले.