वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील विध्वंसाचे युग समाप्त करण्याबाबत आपली कटिबद्धता व्यक्त केली आहे. बायडेन आणि त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांनी अतिशय अटितटीच्या निवडणूकीत ट्रम्प यांच्यावर विजय मिळवला. त्यानंतरच्या आनंदोत्सवादरम्यान बायडेन यांनी आपल्या आगामी कामाचे संकेत दिले.
“मला एकात्मतेसाठी काम करायचे आहे. विभाजनासाठी नाही. डेमोक्रॅटिक अथवा रिपब्लिकन प्रांत असा भेद करायचा नाही. तर अमेरिका म्हणून एकत्र विचार करायचा आहे.’ असे बायडेन शनिवारी रात्री डेलवेरमधील विल्मिंग्टन येथील आपल्या उत्साही समर्थकांसमोरच्या भाषणात म्हणाले.
बायडेन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा लढवल्यावर ते यशस्वी झाले. अमेरिकेच्या इतिहासात अत्यंत वैविध्यपूर्ण आघाडीतून त्यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळले. त्याबद्दल त्यांनी आपल्या समर्थकांना धन्यवादही दिले. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात 77 वर्षीय बायडेन हे सर्वात वयस्क अध्यक्ष ठरले आहेत. 20 जानेवारी 2021 रोजी ते अध्यक्षपदाची सूत्रे घेणार आहेत.
“अमेरिकेने आपल्यावर निर्विवाद विश्वास दाखवला आहे. स्पष्ट बहुमत दिले आहे. हे बहुमत अमेरिकेसाठी दिले आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची आपली जबाबदारी आहे.’ असे म्हणून बायडेन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यंदाच्या निवडणूकीत तब्बल 7 कोटी 40 लाख मतदारांनी बायडेन यांच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र ज्यांनी आपल्याला मतदान केलेले नाही, त्या रिपब्लिकन नागरिकांसाठीही आपल्याला काम करायचे आहे, अशी भूमिकाही बायडेन यांनी स्पष्ट केली.
ट्रम्प यांनी मात्र अद्याप आपला पराभव मान्य केलेला नाही. निवडणूकीच्या निकालाला आव्हन देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
पराभवाचे दुःख काय असते, त्याची मला कल्पना आहे. यापूर्वी दोन वेळा मी देखील पराभूत झालो आहे. मात्र आता आपण एकमेकांना एक संधी देऊ या, असे म्हणून बायडेन यांनी ट्रम्प यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेचा कणा असलेल्या मध्यमवर्गाला पुन्हा उभे करायचे आहे देशाला जगाच्य पातळीवरील सन्मान पुन्हा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी एकात्मता पुन्हा निर्माण करणे गरजेचे आहे, असे बाय्डेन म्हणाले.