पुणे – महापालिका डॉक्टर भरतीत दुजाभाव होत असून, वशिलेबाजीने ही पदे भरली जात असल्याचा आरोप “आम आदमी’ पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी केला आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मनपा आरोग्य विभागात वर्ग 1 च्या 120 आणि वर्ग 2 च्या 57 अशा एकूण 32 संवर्गाच्या 177 डॉक्टरांची/वैद्यकीय अधिकारी पदांची कायम आस्थापनेवरील सरळसेवा भरतीची जाहिरात दि. 17 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सन 2020 च्या मे महिन्यात कागदपत्रांच्या छाननीसाठी उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यानंतर या पदांची प्रारूप यादी जुलै 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
सदर प्रारूप यादीवर काही हरकती असल्यास 2 दिवसांत ऑनलाइन हरकती मागवण्यात आल्या होत्या. परंतु, जाहिरातीतील 177 पदांपैकी फक्त 81 उमेदवारांना पदस्थापना मिळाली आहे, अजूनही 96 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यातील 3 संवर्गाच्या म्हणजेच दंतशल्यचिकित्सक – (6 पदे), भौतिकोपचार तज्ज्ञ- (9 पदे), आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी (9 पदे) अशा एकूण 24 पदांच्या प्रारूप यादी बनवूनदेखील गेले दीड वर्ष अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली नाही. मागील दीड वर्षापासून ही निवड प्रक्रिया का पूर्ण झाली नाही, असा प्रश्न डॉ. मोरे यांनी उपस्थित केला आहे.