कोल्हापूर – पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यासाठी 31 ऑक्टोंबर 2020 ही अंतिम मुदत असल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम युध्दपातळीवर करा, असे निर्देश आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यानी दिले.
कोल्हापूर शहरातील पथविक्रेत्यांची बैठक स्थायी समिती सभागृहात आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस उपायुक्त निखिल मोरे, गटनेते अजित ठाणेकर, माजी महापौर आर.के.पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पोवार, अशोक भंडारी, रघुनाथ कांबळे यांच्यासह इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, रोहित सोनुले, विजय तळेकर, निवास कोळी तसेच फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर शहरातील सर्व पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम सुरु असून शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावेत, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यानी केले. पथविक्रेत्यांनी सर्व्हेच्या कामास सहकार्य करावे, जेणेकरुन शहरातील एकही पथविक्रेता या सर्व्हेपासून वंचित राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
शहरातील सर्व पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण अर्ज स्विकारण्याची 31 ऑक्टोंबर 2020 ही अंतिम मुदत आहे. या मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पथविक्रेता सर्व्हेक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील 5 वर्षे पथविक्रेता सर्व्हेक्षण होणार नसल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावेत, तसेच अज देण्यासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, रस्तयावर न थुंकणे या बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.
पथविक्रेत्यांच्या सर्व्हेच्या कामास मुदतवाढ मिळावी अशी मागणी पथविक्रेत्यांच्यावतीने गटनेते अजित ठाणेकर, आर.के.पोवार, दिलीप पोवार, नंदकुमार वळंजू, अशोक भंडारी आदि मान्यवरांनी केली.
यावेळी शहरातील पथविक्रेत्यांच्यावतीने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.