- प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दत्तात्रय माळी यांचे पद केले रद्द
वडगाव मावळ – चांदखेड गावचे पोलीस पाटील दत्तात्रय माळी यांनी भरती पदासाठी दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरले. तसेच एक गुन्हाही दाखल असल्याचा ठपका ठेवून मावळ, मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी पोलीस पाटील माळी यांचे पद रद्द केले आहे.
पोलीस पाटील पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय लेटरहेड, जिल्हा परिषद बोधचिन्ह यांचा वापर केल्याने अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरले असल्याने तसेच एक गुन्हाही दाखल असल्याचा ठपका ठेवून मावळ, मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी चांदखेडचे पोलीस पाटील दत्तात्रय माळी यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
या संदर्भात चांदखेड येथील अमोल कांबळे, पांडुरंग कदम, प्रशांत होगले, पौरस बारमुख यांनी तक्रार केली होती. दत्तात्रय माळी यांची चांदखेड गावासाठी इतर मागास प्रवर्गातून पोलीस पाटीलपदी 1 मार्च 2018 रोजी नियुक्ती करण्यात आली. भरती प्रक्रियेदरम्यान त्यांनी 16 जून 2017 रोजी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. 9 ऑगस्ट 2017 रोजी पक्षाचा राजीनामा दिला होता.
तसेच वनक्षेत्रपाल मावळ यांना एका राजकीय पक्षाच्या लेटरहेडवर उपोषण करण्याबाबत इशारा दिला होता. तसेच 27 नोव्हेंबर 2017 रोजी पोलीस संरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेल्या अर्जावर जिल्हा परिषदेच्या बोधचिन्हाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.
याशिवाय, माळी यांच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2019 गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई व जामिनावर मुक्तताही झाली होती. त्यामुळे माळी यांनी प्रक्रियेदरम्यान सादर केलेला प्रतिज्ञापत्र खोटे ठरत असल्याने त्यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात आल्याचा आदेश मावळ, मुळशी प्रांताधिकारी शिर्के यांनी दिला.