मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत पंकजा मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी ही यादी जाहीर केली आहे. याआधीही पंकजा यांच्यावर राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती आता पुन्हा कायम ठेवली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये पंकजा मुंडे आपल्याच भाजप पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने पुढे येत होत्या. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, मी भाजपमध्येच राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. तर, सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचेही पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा, असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण पंकजा आपल्यावर निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले.
भाजपाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीत विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रिपदाची, तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली गेली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्ती झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. मिशन 2024 च्या ऐतिहासिक यशासाठी आणि आमचे नेते नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा…’ तसेच यावेळी त्यांनी विनोद तावडे, विजया ताई रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.