पटणा – बिहारमधील बक्सरमध्ये समलैंगिक विवाह झाला आहे. जिल्ह्यातील डुमरगावात हा विवाह झाला असून जिल्ह्यातील हा पहिलाच समलैंगिक विवाह असल्याचे सांगितले जात आहे. या लग्नाची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. अनिशा नावाची मुलगी नवरा तर पायल नावाची मुलगी नवरी बनली आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अनिशा आणि पायल दोघीही एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना एकमेकिंबद्दल आकर्षण वाटू लागले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अगोदर न्यायालयात जाऊन या लग्नाबाबत परवानगी घेतली त्यानंतर मंदिरात जाऊन विवाह केला असल्याचे सांगण्यात आले आहे. अनिशा सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजची रहिवासी आहे तर पायल अररिया जिल्ह्यातील जयनगर गावातील आहे.
दरम्यान, अनिशाच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला आहे. मात्र पायलने हा निर्णय तिच्या घरच्यांच्या विरोधात घेतला आहे. पती बनलेल्या अनिशाने सांगितले की, लहानपणापासून तिचा कल पुरुषांऐवजी मुलींकडे आहे. दरम्यान दोघींनी ऑर्केस्ट्रामध्ये तीन वर्षे एकत्र काम केल्यानंतर त्यांची मैत्री घट्ट झाली. प्रेम वाढत घेतले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वाढते समलैंगिक विवाह ही चिंताजनक बाब असल्याचे अनेकांचे मत आहे.