अहमदाबाद : वैयक्तिक कारणाने मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतूनही माघार घेतली आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत चौथ्या कसोटीतही स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या 9 मार्चपासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
दरम्यान, स्मिथने एकदा सांगितले होते की, तो पुन्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा बाळगत नाही, परंतु आता 33 वर्षीय स्मिथला 9 मार्चपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत पुन्हा पदभार स्वीकारावा लागणार आहे.
तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच नियमित कर्णधार कमिन्स याची आई गंभीर आजारी असल्याने तो मायदेशी परतला होता. त्यानंतर चौथ्या कसोटीसाठी कमिन्स भारतात परतेल अशी अपेक्षा केली जात होती, मात्र आता ती फोल ठरली आहे. आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला नियमित कर्णधार पॅट कमिन्स अजूनही सिडनीत आहे आणि सध्या तो आपल्या आजारी आईसोबत घरीच राहणार आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीतूनही त्याने माघार घेतली असल्याची माहिती क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू cricket.com.au ने दिली आहे.
तिसऱ्या कसोटीत स्मिथने काळजीवाहू कर्णधाराची भूमिका स्वीकारली होती . इंदूरमध्ये पाहुण्या संघाने तिसऱ्या दिवशी नऊ गडी राखून विजय मिळवला. इंदूरमधील विजयासह ऑस्ट्रेलियाने जूनमध्ये लंडनमधील ओव्हल येथे होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठीही पात्रता मिळवली.
Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!
दरम्यान, अंतिम कसोटीनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. कमिन्सच्या या मालिकेत खेळण्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. तसेच क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू Cricket.com.au ने असेही वृत्त दिले आहे की, वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने जखमी जे रिचर्डसनच्या जागी 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळविले आहे.