मुंबई – रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अवधूत तटकरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तटकरे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.
भाजपात प्रवेश केल्यानंतर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाले, मी कोणत्याही दबावाला बळी पडलेलो नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने भाजपात प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले की, अवधुत तटकरे आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत आहे. तटकरे हे मेहनती आणि जनतेची कामे करणारे कार्यकर्ता आहेत. त्यांच्या येण्याने कोकण परिसरात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. तटकरे यांच्या भाजपात येण्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका आहे. असे अनेक झटके त्यांना येत्या काळात मिळत राहतील. अंधेरी पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आम्ही 51 टक्के मत घेवून जिंकून येऊ असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना-काॅंग्रेसचे 4 नगरसेवक भाजपात दाखल –
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरा भाईंदर महापालिकेत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. पालिकेतील चार नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यातील तीन नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटातील असून एक नगरसेवक काॅंग्रेस पक्षाचे आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.