पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोहगाव येथील पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे मोदी यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव असंगबा चुबा, भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ. एच श्रीनिवास, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके उपस्थित होते.
पुणे हा महत्वाचा जिल्हा असून, महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. पुण्याला साजेसे आणि आधुनिक टर्मिनल असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. देशात गेल्या दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. सामान्य माणसासाठी उडान योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे. या विमानतळांचा उद्योगांना लाभ होऊन रोजगारांच्या संधी वाढत आहेत. दळणवळण सेवांच्या विस्तारामुळे उद्योगांनाही चालना मिळते आहे.
डॉ. एच. श्रीनिवास यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
शिवरायांचा अश्वारुढ पुतळा, श्री विठ्ठलाचे म्युरल
टर्मिनलच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहून ऊर भरून येतो. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे. विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे.
एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे. कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे रहात आहे. महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसीत करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.