पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे वाढावी, त्यासाठी लोहगाव विमानतळावरील धावपट्टी वाढण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबतच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी लष्कर विभाग आणि खासगी जागा मालकांशी चर्चा झाली आहे. धावपट्टी वाढविण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
लोहगाव विमानतळ केवळ पुणेकरांसाठीच नव्हे; तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतील नागरिकांसाठी उपयोगाचे ठरते आहे. मागील काही वर्षांत विमानतळावरील प्रवासी संख्या दुप्पट झाली आहे. पुण्यातून थेट दुबई आणि सिंगापूर या दोन ठिकाणीच आंतराराष्ट्रीय विमानसेवा आहे. धावपट्टी लहान असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि विमानांची संख्या वाढविताना अडचणी येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक जागा ही लष्कराकडून आणि काही खासगी जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यानुसार रविवारी नवीन टर्मिनलच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी धावपट्टी वाढविण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
दोन धावपट्टींची आवश्यकता…
दोन धावपट्टी असलेले कोणतेच विमानतळ नसून, सध्या मुंबई विमानतळावर दोन धावपट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुणे विमानतळावरही दोन धावपट्टी होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जागामालकांशी चर्चा झाली असून, राज्य आणि केंद्र स्तरावर याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
धावपट्टी वाढविण्यासाठी खासगी जागा ताब्यात घेणार असून, त्यासाठी राज्य सरकार 60 टक्के, पुणे महापालिका 20 टक्के तर पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए दोन्ही प्रत्येकी 10 टक्के जबाबदारी घेणार आहे. किंवा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनीच मोबदला द्यावा, याबाबत चर्चा केली जाणार आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री