सिंहगड रस्ता – सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान दुभाजकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. परंतु, सलग दुभाजक तयार न करता 40 ते 50 फूट अंतरावर रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवल्याने अशा दुभाजकामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. अत्यावश्यक ठिकाणीच रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेऊन सलग दुभाजक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिंहगड रस्त्यावर नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा दुभाजकाचे काम रखडले होते. ते बांधकाम विभागाने सुरू केले असले तरी तत्पूर्वी दुभाजकासाठी रस्त्याच्या मधोमध सोडलेल्या धोकादायक फटीमुळे सातत्याने अपघात होत होते. याबाबत बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात येत होते, अखेर दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले. परंतु, रस्त्याच्या आजूबाजूचे दुकानदार सांगितील त्याप्रमाणे दुभाजकात जागा सोडण्यात आली आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दुभाजकाचे काम सलग करून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
काम सुरू असताना आजूबाजूचे व्यावसायिक किंवा स्थानिक नागरिक वळण्यासाठी दुभाजकात जागा सोडण्यास सांगतात. मात्र, संबंधित ठेकेदाराला सलग काम करण्यास सांगितले आहे. अपवाद वगळता इतर ठिकाणी सोडलेले दुभाजकाचे काम करून घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड म्हणाले.