पुणे – शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र ते शिवाजीनगर न्यायालय असा मार्ग असणाऱ्या ग्रेड सेपरेटरमध्ये मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी साचून राहिले होते. अग्निशमन दलाची दोन वाहने आणून पंप बसवून पाणी काढण्याचे काम शनिवारी रात्री अकराच्या सुमारास करण्यात येत होते. स्मार्ट सिटीचा तोरा मिरविणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराचे पावसाने वाभाडे काढले असून शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले असून अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहे.
संचेती हॉस्पिटल ते न्यायालय या ग्रेड सेपरेटर मध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूकही बंद केली होती. शुक्रवार शनिवार असे दोन दिवस वाहतूक बंद झाली होती. याच रस्त्यावर मेट्रोचे कामही सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत होती.
जी 20 परिषदेत पुणे महानगरपालिकेला आलेल्या 200 कोटींच्या निधीतून जवळपास 140 कोटी रुपये शहरातील रस्त्यावर करूनही शहरातील रस्त्यांची ही अवस्था असल्याने पुण्याच्या विकासासाठी आलेला निधी कोठे गेला. यातून कुणाचा विकास साधला हे पाहण्याची गरज आहे.