नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथहे नव्या वादात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कमलनाथ यांनी मंदिरांच्या आकाराचा केक कापल्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून कमलनाथ यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. कमलनाथ यांचे हे कृत्य म्हणजे हिंदूंचा अपमान असल्याचे भाजपकडून म्हणण्यात आले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कमलनाथ मंदिराच्या आकाराचा केक कापताना दिसत आहेत. या केकवर भगवा झेंडा आणि हनुमानाचा फोटोदेखील लावण्यात आला आहे. १८ नोव्हेंबरला कमलनाथ यांचा वाढदिवस आहे. छिंदवाडाच्या तीन दिवसीय भेटीवर असताना त्यांचा वाढदिवस निवासस्थानी समर्थकांकडून साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराचा केक कापण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
कांग्रेसियों का भगवान की भक्ति से कोई लेना-देना ही नहीं है, यह बगुला भगत हैं। इनकी पार्टी कभी श्रीराम मंदिर का विरोध करती थी।
आप केक पर बना हनुमान जी रहे हैं और फिर केक काट भी रहे हैं। यह सनातन परंपरा और हिंदू धर्म का अपमान है, जिसको यह समाज स्वीकार नहीं करेगा। pic.twitter.com/iN97G9CbtM
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 16, 2022
कमलनाथ यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली आहे. धार्मिक चिन्ह असलेला केक कापून कमलनाथ यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे चौहान यांनी म्हटले आहे. “कमलनाथ आणि त्यांचा पक्ष खोटे भक्त आहेत. त्यांचा देवाशी काहीही संबंध नाही.
राम मंदिराला विरोध करणाऱ्या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात. या भूमिकेचा निवडणुकीत फटका बसत असल्याचं जाणवताच ते हनुमान भक्त झाले आहेत”, असे टीकास्र चौहान यांनी डागले आहे. हनुमानाचा फोटो असलेला केक त्यांनी कापला, हा हिंदू धर्मासह सनातन संस्कृतीचा अपमान आहे, असेही चौहान म्हणाले आहेत.