मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला अनधिकृत बांधकाम केल्यामुळे चांगलाच चर्चेत होता. यासंबंधी राणे यांनी स्वतः महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याचे बांधकाम तोडण्याचं कामकाज सुरु करण्यात आलं आहे. स्वतः नारायण राणे यांनी हे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिकेने राणे यांच्या बंगल्याची पाहणी करून अनधिकृत बांधकाम झाल्याप्रकरनी एक अहवाल तयार केला होता. याविरोधात राणेंनी कोर्टाचे दार ठोठावत दाद मागितली होती. यानंतर न्यायालयाने पालिकेचा निर्णय मान्य करत अनधिकृत बांधकाम हटवण्यास सांगितले होते. न्यायालयाने २ आठवड्यांमध्ये राणेंनी स्वतः बांधकाम हटवावे नाहीतर महापालिका तोडकं कारवाई करेल असं सांगितलं होत.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणेंनी स्वतः आपल्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंसाठी ही कारवाई म्हणजे मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने यावेळी राणेंना दहा लाखांचा दंडही ठोठावला आहे. बांधकाम पाडल्यानंतर महापालिकेचे अधिकारी पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचे समजते.