काठमांडू – नेपाळमध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत नेपाळी कॉंग्रेसचे उमेदवार रामचंद्र पौंडेल यांचा विजय झाला आहे. नेपाळ 2008 मध्ये प्रजासत्ताक बनल्यापासून ते आता नेपाळचे तिसरे संविधानिक अध्यक्ष बनणार आहेत. पौंडेल यांना 8 पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये नेपाळी कॉंग्रेस आणि सत्तारुढ “सीपीएन’ (माओवादी सेंटर) या पक्षांचा समावेश आहे.
अध्यक्षपदासाठी एकूण 882 सदस्य मतदान करणे अभिप्रेत होते. त्यामध्ये संसदेच्या 332 आणि 7 प्रांतांच्या विधानसभांच्या 550 सदस्यांचा समावेश होता. 518 प्रांतीय असेंब्ली सदस्य आणि 313 फेडरल संसद सदस्यांनी मतदान केले, असे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शालिग्राम यांनी सांगितले. नेपाळच्या संसदेतील 214 आणि प्रांतीय विधानसभांमधील 352 सदस्यांची मते पौंडेल यांना मिळाली.
नेपाळ कॉंग्रेस या विरोधी पक्षाच्या नेत्याची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या पक्षाचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांनी आनंद व्यक्त केला असून पौंडेल यांचे त्यांनी अभिनंदन देखील केले आहे. नेपाळी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पंतप्रधान प्रचंड यांनी पाठिंबा दिल्यामुळे आघाडी सरकारमधील दोन प्रमुख पक्षांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.