राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्षपदी सचिन कोळी यांची बिनविरोध निवड

इस्लामपूर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या इस्लामपूर शहराध्यक्षपदी सचिन कोळी व कार्याध्यक्षपदी स्वरुप मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांनी या निवडी जाहीर केल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या हस्ते कोळी व मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन पदाधिकाऱ्यांनी राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राज्य चिटणीस अरुण कांबळे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला शहराध्यक्षा सौ. रोझा किणीकर उपस्थित होत्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी टाकलेला विश्‍वास सार्थ करू. शहरात युवकांचे मजबूत संघटन उभे करू, असा विश्‍वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सचिन कोळी यांनी तगड्या उमेदवाराविरोधात पालिका निवडणूक लढवली होती. त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे. विजय पाटील म्हणाले, युवकांची मजबूत फळी उभी करा. खंडेराव जाधव यांनी 25 वर्षे या पदावर प्रभावी काम केले आहे.

खंडेराव जाधव म्हणाले, संघटना बांधताना संघर्ष करावा लागतो. पक्ष व नेत्यांवरची निष्ठा महत्वाची आहे. तुम्हाला युवा नेते राजवर्धन पाटील यांच्यासारखे उमदे नेतृत्व मिळाले आहे. काम करणाऱ्यांच्या चुका होतात. प्रत्येकाने झोकून देवून काम करा. यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अरुण कांबळे यांनी यापूर्वी युवक संघटनेत प्रभावी काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यांना साहेबांनी मोठी संधी दिल्याचे सांगितले.

प्रारंभी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक भाषणात युवा नेते राजवर्धन पाटील यांनी या निवडी केल्याचे सांगितले. महिला शहराध्यक्ष सौ. रोझा किणीकर यांनी आभार मानले. माजी नगरसेवक सदानंद पाटील, उपाध्यक्ष रवी वाघमोडे, सामाजिक सेलचे शहराध्यक्ष गोपाल नागे, राजू खरात, धीरज भोसले, मोहन भिंगार्डे, वैभव भोसले, शकील जमादार, बिरू केसकर, विश्‍वजित पवार व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)