अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व : आदरणीय शरद पवारसाहेब

देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून आदरणीय शरद पवारसाहेबांकडे पाहिले जाते. साहित्य, कला, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची असलेल्या साहेबांचे व्यक्‍तिमत्त्व अष्टपैलू आहे. माझा आणि त्यांचा संबंध 1980 पूर्वीपासून आहे. मात्र, राजकारणात जवळीक निर्माण झाली ती 1980 नंतरच. देशाच्या विकासाचा चौफेर विचार करून वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून आदरणीय शरद पवारसाहेबांकडे पाहिले जाते. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने…

शरद पवारसाहेबांनी देशाच्या व राज्याच्या हिताचे निर्णय घेऊन देश व महाराष्ट्र पुढे नेण्याची संकल्पना राबवली. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा मोठा निर्णय घेतला. यासारखे अनेक निर्णय घेऊन राज्य प्रगतिपथावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना त्यांनी ग्रामीण भागात पूर्णत्वास नेल्या.

उदाहरण द्यायचे झाले तर रोजगार हमी योजनेतून राष्ट्रीय फलोद्यान योजना ही शेतकऱ्यांना दिलेली मोठी देणगी म्हटले तर चुकीचे होणार नाही. कोकण व मराठवाड्यातही त्याचा लाभ झाला. पश्‍चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागातील अनेक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. त्यामुळेच काजू, हापूस आंबा, चिकू या फळांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी फळपिकांकडे वळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध झाला. याचा सर्वाधिक फायदा पाटण तालुक्‍याला झाला.

अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना वीज बिल माफीसुद्धा त्यांनी दिली. त्याचा लाभ राज्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील गावांमध्ये झाला. अनेक गावे भरमसाठ वीज बिलांच्या बोजातून मुक्त झाली. राज्यात नव्या उद्योगधंद्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले. त्यातून अनेक व्यवसाय उभारले गेल्याने बेरोजगारी कमी झाली. राज्यात त्यांनी नवनवीन कल्पना रुजवल्या. शेतीला पाणी मिळण्यास प्राधान्य दिले. ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आणि अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला त्यांनी अनेक वेळा मदतीचा हात दिला. त्यामुळेच कृषिक्रांती झाली.

याचे उदाहरण द्यायचे झाले तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसारख्या संस्था स्थापन करून ऊस शेतीबाबत संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले. सुसंस्कृत, साहित्याबद्दल प्रेम, कलाकारांना दिलेले प्रोत्साहन यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व सरस ठरले. त्यांच्या अनेक निर्णयांबद्दल विरोधकांकडून संशय निर्माण केला गेला; परंतु प्रत्येक गोष्टीत चौकस व अभ्यासू वृत्तीमुळे ते सरस ठरले. त्यांच्या व्यक्तिगत द्वेषापोटी काही लोकांनी टीका केली; परंतु त्यांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा व ध्येयपूर्तीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन महाराष्ट्र घडवला, हे नाकारून चालणार नाही.

देशावरील किंवा राज्यावरील नैसर्गिक संकटांना कशा प्रकारे सामोरे जावे, हे त्यांनी किल्लारी येथील भयंकर भूकंपात दाखवून दिले. त्यांच्या कामाची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली. त्यावेळी पाटण तालुक्‍यालाही भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांनी 19 कोटी रुपयांची मदत दिली होती. पाटण तालुक्‍यावर त्यांचे विशेष प्रेम व राज्यकर्ते म्हणून विशेष लक्ष होते. माझे आणि त्यांचे अनेक वर्षांचे जवळचे संबंध आहेत. आम्ही दोघांनी ते जपले आहेत. कार्यकर्त्याला नावाने ओळखणारे फार थोडे नेते दिसतात, हेच पवारसाहेबांचे वैशिष्ट्य आहे. आदरणीय पवारसाहेब कार्यकर्त्यांना त्यांच्या खोड्यांसकट ओळखतात; परंतु कार्यकर्त्याला त्याची पुसटशी जाणीव होऊ देत नाहीत. देशातल्या कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातील जनतेच्या व उद्योगपतींच्या सर्व प्रश्‍नांची जाणीव असलेला एकमेव नेता म्हणून त्यांना देशात ओळखले जाते. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!

– विक्रमसिंह पाटणकर
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री.
शब्दांकन : सूर्यकांत पाटणकर, पाटण.

Leave A Reply

Your email address will not be published.