लष्करी अळीचा ज्वारी पिकावर हल्ला

पिकांच्या नुकसानीने शेतकरी चिंताग्रस्त; ज्वारी पिकावर सुरू आहे औषध फवारणी

बुध –  खटाव तालुक्‍यात अतिवृष्टीने यापूर्वी द्राक्षबागांसह अनेक पिकांना मोठा फटका बसला असतानाच आता ज्वारी, मका व तत्सम तृणधान्य लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करू लागला आहे. शेतकऱ्याची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली
आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेती व्यवसाय तोट्यातच जातो. त्यातच खटाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका असून दुष्काळी पट्ट्यात रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. ज्वारीच्या पेरण्या उशिरा झाल्या. ज्वारी पिकाबाबत शेतकरी मोठा आशावादी होता. पीक जोमदार आले असतानाच ठिकठिकाणी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी, चारा पीक घेणारे पशुपालक पुरते हवालदिल झाले आहेत.

ज्वारी पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल सुरू केला आहे. ही अळी पिकाच्या वरच्या भागात हल्ला करून थेट मुळापर्यंत जाते, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या अळीच्या नियंत्रणासाठी ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनीच शक्कल लढवली आहे. ग्रामीण भागात सहज मिळणाऱ्या पिवळ्या रंगाच्या वॉशिंग पावडरचा फवारा मारला जात आहे. यामुळे या अळीचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र सध्याच्या स्थितीत लष्करी अळीचा
पिकावर वाढलेला प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. ही लष्करी आळी सर्व प्रकारच्या तृणधान्य पिकावर हल्ला करते. ज्या ठिकाणी मक्‍याचे
पीक घेतल्यानंतर त्या क्षेत्रात कोणतेही पीक घेतले तरी त्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव आढळतो असा अनुभव शेतकरी सांगत आहेत.

कृषी विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज
एखाद्या किडीचा प्रादुर्भाव पिकावर होताच कृषी विभागाने माहितीपर शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे. यापूर्वी लष्करी अळीने मका पिकाचे प्रचंड नुकसान केले. आता लष्करी अळीने ज्वारीचे नुकसान आरंभले असताना मार्गदर्शनासाठी कृषी विभागाने तातडीने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.