पिंपरी – सुरवातीला अत्यंत अतितटीच्या वाटणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या काही फेऱ्या वगळता नंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी बाजी पलटवत भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा एकतर्फे 19 हजार 808 मतांनी पराभव करुन मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले. अण्णा बनसोडे यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीला तब्बल पाच वर्षानंतर विजयोत्सव साजरा करता आला.
पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये चुरशीची लढत होती. मतदारसंघात केवळ पन्नास टक्के मतदान झाल्यामुळे कोणाचा विजय होणार यावर मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. सकाळी मतमोजीला सुरुवात झाल्यानंतर पिंपरीत अत्यंत अटीतटीची लढत पहावयास मिळाली.
पहिल्या फेरीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी 5 हजार 680 मते घेवून 1 हजार 699 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीतही चाबुकस्वार यांची आघाडी कायम राहिली. यानंतर झालेल्या प्रत्येक फेरीत काही मते घेत चाबुकस्वार हे आघाडीवर होते. सहाव्या फेरीमध्ये बनसोडे यांनी चाबुकस्वार यांची आघाडी मोडित काढत अल्पशी आघाडी घेतली. यानंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये पुन्हा चाबुकस्वार यांनी आघाडी कायम केली. त्यानंतर मात्र बनसोडे यांनी प्रत्येक फेरीनिहाय आघाडी घेत चाबुकस्वार यांना मागे टाकले. 11 ते 19 या फेऱ्यांमध्ये बनसोडे यांनी आपले वर्चस्व कायम राखत 16 हजार 856 मतांची आघाडी घेतली. शेवटच्या 20 व्या फेरीपर्यंत अण्णा बनसोडे यांनी पुन्हा 2 हजार 762 मतांची मतांची आघाडी घेत 86 हजार 985 मते मिळविली. तर शेवटच्या फेरीअखेर चाबुकस्वार यांना 67 हजार 177 मते मिळाली. 19 हजार 808 मतांची आघाडी घेत बनसोडे विजयी झाले. फेररचनेनंतर पिंपरीचे पहिले आमदार म्हणून अण्णा बनसोडे निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये गौतम चाबुकस्वार यांच्याविरुद्ध त्यांचा पराभव झाला.
अस्तित्व राखले
पिंपरी-चिंचवड शहरातून मागील काही वर्षात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात 46 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. पक्षाच्या अधिकृत चिन्हावर केवळ पिंपरीमध्येच उमेदवार उभे होते. मात्र, अण्णा बनसोडे यांनी विजय साकारत पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व तर राखलेच मात्र पक्षाला आमदार मिळाल्याने राष्ट्रवादीला पुन्हा लढण्यासाठी उर्जा मिळवून दिली.