रेडा – संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत महाआघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तत्रय भरणे यांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन यांचा 3 हजार 110 मतांनी पराभव केला.
दत्तात्रय भरणे यांना पोस्टल मतदानासह एक लाख 14 हजार 960 मतदान मिळाली तर हर्षवर्धन पाटील यांना 1 लाख 11 हजार 850 मतदान मिळाले. यामध्ये भरणे यांनी 3 हजार 110 मताधिक्याने विजयी झाले. मतमोजणी इंदापूर शहरातील शासकीय गोदाम येथे करण्यात आली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आघाडीवर होते. परंतु उर्वरित फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना मताधिक्य मिळत गेले. त्यामुळे दत्तात्रय भरणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
इंदापूर विधानसभेत माझा विजय हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. माझा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील निष्ठावंत मतदारांना शेवटच्या क्षणापर्यंत मला मते देऊ नका म्हणून त्यांच्यावर मोठ्या ताकदीने दबाव टाकला. परंतु मी केलेली विकासकामे मी केलेली सर्वसामान्य जनतेची सेवा याचे श्रेय मतदारांनी विरोधी उमेदवाराला न देता माझ्या पारड्यात टाकले. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना मतपेटीतून मतदारांनी चोख उत्तर दिले आहे.
– दत्तात्रय भरणे, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस