वळसे पाटील यांचा ऐतिहासिक सप्तरंगी विजय

सलग सातव्यांदा विजयी होण्याचा विक्रम

मंचर – आंबेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला. वळसे पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ती शेवटच्या 24व्या फेरीपर्यंत कायम ठेवली. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना ही आघाडी तोडण्यात शेवटपर्यत यश आले नाही. अखेर दिलीप वळसे पाटील 66 हजार 775 मतांनी विजयी झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.

सकाळी आठ वाजता भीमाशंकर आणि आसाणे खोऱ्यातील आदिवासी भागातून मतमोजणीला प्रारंभ झाला. सव्वाआठच्या सुमारास पहिली फेरी जाहीर झाली आणि जणू विजयाची ती नांदीच ठरली. तीन हजार 128 मतांचे मताधिक्‍य पहिल्या फेरीतच वळसे पाटील यांना मिळाले. दुसऱ्या फेरीत 3 हजार 644, तिसऱ्या फेरीत 5 हजार 493, चौथ्या फेरीत 4 हजार 752, पाचव्या फेरीत 5 हजार 267 मतांनी आघाडीवर होते. वळसे पाटील यांच्या मताधिक्‍यामध्ये प्रत्येक फेरीत वाढ होत गेली.

शिरुरच्या 39 गावांची जसजशी मतमोजणी होऊ लागली तसतशी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या मताधिक्‍यात वाढ होत गेली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत होत होता. दीड वाजता 66 हजार 775 मतांनी वळसे पाटील यांच्या विजयावर शिक्‍कामोर्तब झाले.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. याचे सर्व श्रेय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जाते. त्यांनी राज्यभर झंझावती दौरे करुन शिवसेना-भाजप सरकारचे अपयश जनते पुढे ठेवले. जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवली. जनतेने मला दिलेला कौल मला मान्य आहे. त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो. या विजयात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्यांचे आभार मानतो. विजय हा पहिल्या दिवशीच ठरला होता; परंतु मताधिक्‍य मोठे मिळेल अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. शिरुर लोकसभा मतदार संघातील सहापैकी पाच जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत. पुढील पाच वर्षांत मी जनतेच्या कामांसाठी सदैव कार्यरत राहील – दिलीप वळसे पाटील, आमदार

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.