‘बीएचआर’ घोटाळाप्रकरणी खडसेंचा पत्रकार परिषदेत ‘गौप्यस्फोट’

जळगाव – बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी 2018पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्यावेळी हे प्रकरण दडपण्यात आले. या प्रकरणात बड्या नेत्याचे नाव असून यातील सर्व सत्य लवकरच बाहेर येईल, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

बीएचआर सहकारी बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ऍड. किर्ती पाटील देखील उपस्थित होत्या.

खडसे म्हणाले, बीएचआरमध्ये सुमारे 1100 कोटींचा घोटाळा झाला आहे. याबाबत 2018 मध्ये ऍड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी ईओडब्ल्यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्याने तात्पुरती स्वरूपाची चौकशी झाल्याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले.

इतकेच नाही, तर त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्याचे खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या चौकशीदरम्यान सापडलेल्या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.