महाराष्ट्राच्या मॅंचेस्टर नगरीला थेट चीनचे आव्हान

वस्त्रोद्योगाला घराघर ः केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज

कोल्हापूर – श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा बांधली. मात्र करोना, सरकारी धोरण आणि चीनमध्ये तयार होवून बांगलादेश व्हाया महाराष्ट्रात येणारे चीनचे कापड हे महाराष्ट्राच्या मॅंचेस्टर सिटीला आव्हान ठरू लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात केंद्र सरकार किती गांभीर्यपूर्वक उद्योगाकडे लक्ष देते हे यावरून दिसून येते. कारण चीनमध्ये उत्पादन होणारे कापड बांगलादेशच्या माध्यमातून भारतात येते. त्याचा फटका इचलकरंजीसह देशातील यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला बसत आहे.

चीनमधील असणारे कामगार कायदे, मोठ्या प्रमाणात निर्यात केला जाणारा माल हा तेथील उद्योजकांना फायदेशीर ठरतो. भारतात कापड आल्यानंतर देखील स्थानिक मालापेक्षा चीनचा माल स्वस्त पडतो. यामुळे भारतीय माल बाजारात पडून राहतो. याबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अधिकृत व अनधिकृतपणे येणारे चीनचे कापड हे भारतीय व्यवसायाला मारक ठरत आहे.

देशात 24 लाख यंत्रमाग व्यवसाय आहेत. मालेगाव, भिवंडी आणि इचलकरंजीला याचा अधिक फटका बसतो. करोनामुळे कापड उत्पादकही अडचणीत आले आहेत. इचलकरंजी शहर आणि परिसरात सुमारे सव्वा लाख साधे यंत्रमाग आहेत. गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक शटललेस यंत्रमाग सुरू झाले आहेत. अशा प्रकारचे उत्पादकही साध्या मागावरील कापडाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यामुळे कापडाचे उत्पादन कमी करण्यापासून ते हा व्यवसायच बंद करण्याच्या स्थितीत हा व्यवसाय आला आहे.

यामुळे अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राच्या मॅंचेस्टर नगरीला जर उर्जितावस्था द्यायची असेल तर केंद्र सरकारने या मुद्द्याकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा भविष्यात इचलकरंजीची मॅंचेस्टर नगरी ही ओळख पुसली जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.