अकोला- महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदीचा कायदा बनवला असलात तरी, या प्लास्टिक बंदीच्या कायद्यला राजकीय पक्षांनीच हरताळ फासल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे नऊ सप्टेंबरला पारपडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्लास्टिक ग्लासचा सर्रास वापर करण्यात आला आहे. दरम्यान, संबधित नगरपालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आयोजकांना चांगलाच दणका दिला आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. संत गाडगेबाबा विद्यालयातील प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे आलेल्या नागरिकांसाठी आयोजकांमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.
दरम्यान, याठिकाणी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आले होते. सभा संपल्यानंतर येथे प्लास्टिक ग्लासचा मोठा ढीग तयार झाला होता. त्यानंतर मूर्तिजापूर नगरपालिकेने यासंदर्भात सभेच्या आयोजकांवर दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. तर ही रक्कम लवकरच वसूल करण्यात येणार असल्याचे देखील नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.