जुन्नर- राज्य परिवहन महामंडळाच्या कुर्डुवाडी डेपोतून जुन्नरला मुक्कामी येणाऱ्या तीनही बस काही महिन्यांपूर्वी महामंडळाने अचानक बंद केल्या होत्या. त्यांचा मुक्काम जुन्नर ऐवजी ओझर येथे हलविला होता. त्यामुळे पंढरपूर, पुणे येथून जुन्नरला येणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत होती. पंढरपूर-जुन्नर गाडी पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
पहाटे पाच, साडेपाच आणि साडेसहा वाजता जुन्नरहून सुटणाऱ्या या तीनही गाड्या पुणेमार्गे पंढरपूरला जात असल्यामुळे प्रवाशांसाठी सोयीच्या ठरतात. मात्र, जुन्नर बस स्थानकात निवासाची सोय अपुरी असल्याची तक्रार या गाड्यांवरील चालक व वाहकांची आहे. या ठिकाणी मुक्काम असलेल्या खोलीमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी असून जागाही अपुरी असल्याची तक्रार आहे. नारायणगाव आगाराचे प्रभारी डेपो मॅनेजर दळवी यांनी या चालक-वाहकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. सध्या वाढत्या रहदारीच्या कोंडीमुळे पहाटे लवकर सुटणाऱ्या या तिन्ही गाड्यांना सकाळी गर्दी असते, तसेच पुणे व इतर ठिकाणांहून परतीच्या प्रवासाला या गाड्या गरजेच्या असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी सांगितले.