श्रीकांत कात्रे
सातारा -विधानसभेचा कराड दक्षिण मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघांमध्ये खिळखिळ्या झालेल्या कॉंग्रेसचे दिवस पुन्हा बदलण्याची आशा कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. एकमेकांमधील गटबाजीमुळे कॉंग्रेसचे जिल्ह्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटांचे मनोमीलन होत आहे.
पृथ्वीराज चव्हाण (बाबा) आणि विलासराव उंडाळकर (काका) या नेत्यांमधील टोकाच्या मतभेदांमुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ उभारी मिळाली नाही. दोघेही राज्याच्या राजकारणात मातब्बर मानले जातात. बाबांची थेट दिल्ली दरबारी उठबस. 1991 ते 1999 या काळात लोकसभेच्या सर्व निवडणुकांमध्ये कराड मतदारसंघातून कॉंग्रेसकडून बाबांच्या गळ्यात विजयाची माळ पडायची, तरीही त्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता तो काकांचाच. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाला आणि लोकसभेच्या कराड मतदारसंघातून बाबांची विकेट पडली. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यानी विजय मिळवला. बाबांना पुन्हा लोकसभेत जाता आले नाही; पण दिल्लीतील वजनामुळे राज्यसभेची संधी, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रिपद आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपदही पदरात पडले. जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक बळकट होत असताना काका मात्र आपले वजन कायम ठेवून होते. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील अभेद्य गडात कराड दक्षिण मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात ठेवून त्यांनी पंजा मजबूत ठेवला होता.
त्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली. जिल्हा बॅंकेसह सर्व महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये काका गटाचा बोलबाला राहिला. बाबा आणि काका आपापल्या ठिकाणी मोठे होत गेले; पण कॉंग्रेसमध्ये असूनही दोघांमधून विस्तव जात नव्हता. राष्ट्रवादीचे तगडे आव्हान असूनही जिल्ह्यात कॉंग्रेससाठी दोघांमध्ये दिलजमाई झाली नाही. कराड दक्षिण मतदारसंघ आजपर्यंत कॉंग्रेसकडेच राहिला, 2014 च्या निवडणुकीपर्यंत काकांकडे आणि नंतर बाबांकडे. 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने काकांऐवजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराजबाबांना उमेदवारी दिली. काका अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. भाजपचे अतुल भोसलेही लढत होते. तिरंगी लढतीत बाबांनी विजय मिळवला. मतदारसंघ कॉंग्रेसकडे राहिला. एवढे होऊनही काकांनी कॉंग्रेसशी असलेली नाळ तोडली नाही. त्यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह यांच्या राजकीय कारकीर्दीची पेरणी झाली होती. काकांचा पराभव आणि उदयसिंह यांचे भवितव्य यातच मनोमीलनाची बीजे रुजली. आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत आहे.
जिल्ह्यात कॉंग्रेस 1995 पर्यंत अभेद्य होती. तोपर्यंत इतर पक्षांना जिल्ह्यात स्थानच नव्हते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कॉंग्रेस क्षीण होत गेली. काका-बाबा यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेले प्रतापराव भोसले हे कॉंग्रेसचे आणखी एक बडे नेते आहेत; परंतु प्रतापराव, बाबा व काका यांची सांगड कधी जुळलीच नाही. याउलट कॉंग्रेसमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भक्क्म होत गेली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची जिल्ह्यावर पकड राहिली. बाबा आणि काका आपले राजकीय वैर जपत राहिले. पक्षापेक्षाही या दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत धुसफूस संपली नाही. परिणामी कॉंग्रेस दुबळी झाली. आता होणारे मनोमीलन म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कॉंग्रेसकडै जिल्हा पातळीवर भक्कम नेतृत्व उरलेले नाही.
विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण वगळता इतर मतदारसघांमध्ये तुल्यबळ उमेदवार पक्षाला मिळू शकत नाहीत. तालुका पातळीवरही कार्यकर्त्यांची फळी गुलदस्त्यात गेली आहे. नव्याने कार्यकर्तै उभे राहात नाहीत, अशा वेळी मनोमीलन होत आहे. पक्षाला पुनर्वैभव मिळवून देण्याची भाषा आता बोलली जाईल; पण किमान उभारी मिळाली तरी खूप होईल, अशी अवस्था आहे. मनोमीलनातून काका-बाबा गटांचे बस्तान बसेल. कदाचित कार्यकर्त्यांची कुठेकुठे वर्णी लागेल; पण पक्षाला उर्जितावस्था कितपत मिळेल, हे सांगणे कठीण आहे. भाजप, शिवसेना हे विरोधातील पक्ष आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची दखल घेत राष्ट्रवादीचेच आव्हान कॉंग्रेसला पेलावे लागणार आहे.
नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर चाललेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या प्रयत्नांना बाबा आणि काका दिशा देतीलही; पण पक्ष संघटन बळकट करण्यासाठी फौज उभी करण्याचे काम सुरवातीला करावे लागणार आहे. नेत्यांच्या पातळीवर काही पुनर्वसनाचे पर्याय असतील. सामान्य कार्यकर्त्याला उभारी देण्यासाठी पक्ष काय करणार, यावरही भवितव्य अवलंबून असेल. पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना विश्वास द्यायला हवा. गावागावातून कार्यकर्त्यांची जुळणी करायला हवी. यातून पक्ष बळकट होऊन जिल्ह्याच्या विकासाला मदत झाली तरच काका-बाबा मनोमीलनाचे सार्थक होईल.